भांडवलशाही-ब्राम्हणशाही विरोधात समतेचे विचार पेरणारे लढवय्ये कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड
येवला, (वार्ताहर) : नासिक जिल्ह्यातील समतावादी युवकांनी नामांतराच्या लढ्यामध्ये यशस्वीपणे सहभाग दिला. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील 85 युवकांनी येवल्यात विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावर (1978) अटक करून घेतली. या सत्याग्रहाच्या संघटन बांधणीत अशोक परदेशी, सुरेश पगारे, प्रा.रणजित परदेशी कॉ.भगवान चित्ते, प्रा. वागदरीकर यांच्या बरोबरच अरुण ठाकूर यांनीही सहनेतृत्व दिले होते. दिनकर साळवे, अरुण ठाकूर, जी. एस. कांबळे यांच्या आकस्मित निधनामुळे समाजवादी चळवळीचा मार्ग नव्याने तेजोमय करण्याची जबाबदारी उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांपुढे आहे, असे प्रतिपादन येवला येथील सत्यशोधक प्रबोधन वर्गात व्यक्त करण्यात आले.
8 व्या व 9 व्या दशकातील परिवर्तनवादी चळवळ या कार्यकर्त्यांनी एकसाची होऊ दिली नाही. राजकीय लढ्यात सामाजिक प्रबोधनाची जोड लोकशाही प्रबोधनात, आणीबाणी विरोधी उपक्रमांची सांधे जोड आणि संसदीय राजकारणाला शैक्षणिक उपक्रमांची साथ हे दिनकर साळवे (संगमनेर), अरुण ठाकूर (नासिक) आणि जी. एस. दादा कांबळे (औरंगाबाद) यांच्या कामाचे व चळवळीचे वैशिष्ट्ये होते. अलका महाजन (मनमाड), सुभाष परदेशी (मालेगाव), अनिल पाटील (जळगाव), मोहन गुंजाळ (धुळगाव), अर्जुन कोकाटे (साताळी), प्रभाकर मुराळकर (मनमाड), राजू वैराळ (विळद), प्रकाश गोसावी (कोपरगाव), अशोक दुबे (कोपरगाव,देर्ढे) भास्कर कोल्हे (हडपसावरगाव) विक्रम गायकवाड आणि सुवर्णा चव्हाण (येवला), किशोर ढमाले (पुणे), किशोर जाधव (पुणे) आदींनी या चळवळीचे नेतृत्व केले. जाती विरोधी लढा व संस्कृतीक-सांसदीय वर्चस्वा विरोधी नेतृत्व हे नाशिक जिल्ह्यातील चळवळीची प्रेरणास्त्रोत होते. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असतांना मार्क्स-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना अधिक गती देण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावर सोपवली आहे, हि जबाबदारी आपण स्वीकारून पुढे वाटचाल करणे, त्यांच्या प्रकाशात लढणे हीच खरी श्रद्धांजली दिनकर साळवे, अरुण ठाकूर आणि जी.एस.दादा कांबळे यांना असेल. या सोबतच स्मिताताई कोळस(येवला) यांनाही यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
अर्जुन कोकाटे, डॉ. सुरेश कांबळे, बापूसाहेब पगारे, कॉ. भगवान चित्ते, नानासाहेब पटाईत, जितेश पगारे, सुवर्णा चव्हाण, निर्मला कुलकर्णी चहाबाई अस्वले, दिनकर दाणी, सुरेश खळे, आनंद चित्ते आदीनी समतेच्या विचारांची आदरांजली यावेळी अर्पण केली.
-------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा