येवला मनमाडला पिण्यासाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडा
छगन भुजबळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
येवला, दि.२३ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : येवला शहर व तालुका आणि मनमाड (ता.नांदगांव) शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड धरणाचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.
छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, येवला शहर व येवला तालुक्यातील ३८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाण्याचा साठा संपत आलेला आहे.येवला व ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे ५६ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे ४७ गांवे व २९ वाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला नगरपालिकेच्या जलाशयाजवळील नांदूर येथे अधिग्रहित केलेल्या विहिरीमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरले जातात. मात्र या जलाशयातील पाण्याचा साठा संपत आल्यामुळे टँकर भरण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील गावांमध्ये टँकरच्या खेपा कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे मनमाड(ता.नांदगाव) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटोदा धरणातील पाण्याचा साठा संपल्यामुळे मनमाड शहरामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पालखेड धरणातून मनमाड,येवला शहर व येवला तालुक्यातील जलाशयांसाठी तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येवला शहर व तालुका आणि मनमाडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने पालखेड धरणाचे आवर्तने सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा