येवला मुक्तीभूमी येथे कायस्वरूपी विक्री केंद्र इमारत बांधकामासाठी निधी मंजूर
येवला (प्रतिनिधी) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण योजनेतून येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी येथे कायमस्वरूपी विक्री केंद्र इमारत बांधकामासाठी ५० लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून या विक्री केंद्राच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणार आहे.
येवला मुक्तीभूमीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून छगन भुजबळ यांनी येवला विधानसभेचे आमदार झाल्यानंतर या ठिकाणी विश्वभूषण स्तूप, विपश्यना हॉल, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी साकारले तसेच या भूमीचे सुशोभिकरण केले.
मुक्तीभूमीवर प्रशिक्षण हॉल, ग्रंथालय, अॅम्पीथिएटर, अतिथी निवासस्थान, कर्मचारी निवासस्थान, पाणी पुरवठा व मलनिःसारण व्यवस्था आणि विद्युत जनित्र इ. सुविधा निर्माण करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू आहे.त्यांच्या प्रयत्नामुळे नाविन्यपूर्ण योजनेतून मुक्तीभूमी येथे कायस्वरूपी विक्री केंद्र इमारत बांधकामासाठी ५० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी विक्री केंद्र उभे राहणार असून त्याचा फायदा याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटक व बौध्दबांधवाना होणार आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथील मुक्तीभूमीवर धर्मांतराची घोषणा केली. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी या नावाने संबोधण्यात येते. दरवर्षी दि.१३ ऑक्टोबर, विजयादशमी व दि.१४ एप्रिल या दिवशी देशभरातून बौध्दबांधव मुक्तीभूमीवर डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. या दिवशी येवल्यात मोठा जनसागर लोटलेला असतो,शहरातील सर्व रस्ते माणसांनी भरलेले असतात तसेच वर्षभर लाखो पर्यटक आणि बौध्दबांधव येथे भेटी देत असतात. या स्थळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा