येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शहरात संचारबंदी कडक करा - पालकमंत्री भुजबळ



उपाययोजना आणि नियोजनाबाबत येवला येथे आढावा बैठक 

येवला : शहरात रुग्णसंख्या दरमहा वाढत असून त्यावर पुढील आठ दिवसात नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले नाही तर कठोर पाऊल उचलावी लागनार असून प्रसंगी लॉकडाऊन करण्यात येईल असे सांगत ज्या भागात पेशंट अधिक आहे अशा भागात संचारबंदी कडक करण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी आपापले काम चोख बजावण्याबत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहर व परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत असल्याने अधिक लक्ष देण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी त्याबाबत नियोजन करावे. अतिदक्षता म्हणून येवला शहर आणि तालुक्यात कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधें पुरविण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात येऊन कंटेंटमेंट झोन मध्ये कडक नियोजन करण्यात यावे असे सांगत मास्क न वापरणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रसंगी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

ते म्हणाले की, शहर व ग्रामीण भागात ज्या भागात पेशंट सापडले आहे त्या भागात संचारबंदी कडक करण्यात येऊन त्या परिसरातील कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधे पुरविण्यात यावीत.  लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना बाभूळगाव येथे पाठविण्यात यावे ऑक्सिजन बेडसवर डिसीएचसी मध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रुग्णांना ठेवण्यात यावे. त्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या. नगरसुल येथे संपूर्ण २८ बेड ला कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करावी त्याचबरोबर येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


येवला शहरात कोरोना सोबतच इतर साथ रोगांचा पावसाळ्यात शिरकाव होऊ नये यासाठी अतिदक्षता म्हणवून प्राधान्याने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन शहर नियमित स्वच्छ ठेवण्याचे आदेश नगरपालिकेच्या  मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शेतकरी खरीप हंगाम पीक कर्जवाटप, मका खरेदी व खत वाटपा बाबत आढावा घेतला. त्यानुसार येवला तालुक्याला असलेल्या ८० कोटींच्या इष्टांक पैकी ३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. येवल्याला कर्जमाफीची १५० कोटी तर निफाड तालुक्याला १३३ कोटी रुपये रक्कम प्राप्त होणार असून ही संपूर्ण रक्कम पिककर्जासाठी वितरित करावी अन्यथा जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मका खरेदीसाठी गोडाऊन शिल्लक नसेल तर तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी करावी, खरेदी प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी काट्यांची संख्या वाढवावी व खरेदी प्रक्रिया बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यासोबत काळाबाजार व लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, निफाडचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप कराड, कार्यकारी अभियंता उमेश पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
-- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा