येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

देखभाल दुरूस्तीसाठी कार्यालये उघडण्याच्या मागणीवर उच्चाधिकार समिती निर्णय घेणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 28; देखभाल दुरुस्ती व कर्मचाऱ्यांचे पगार वितरित करण्यासाठी निर्यात व्यवसायिकांचे कार्यालये सुरू करण्यासाठीची मागणी कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीपुढे ठेवून त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. भारतीय निर्यात फेडरेशनच्या (फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट) पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.

संघटनेचे प्रादेशिक संचालक खालिद खान यांनी श्री. देसाई यांचे स्वागत करून संघटनेची भूमिका विषद केली. संघटनेचे अध्यक्ष शरद कुमार शर्मा, सीईओ अजय सहाई व इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

दरम्यान, राज्य शासन संघटनेच्या सूचनांवर सकारात्मक विचार करून मार्ग काढेल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी व इतर देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यासाठी कार्यालये सुरू करण्याची मागणी केली. कार्यालये किंवा कंपन्या सुरू झाल्यास स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळून त्यांच्या समस्या दूर होतील. हे करताना शासनाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची हमी पदाधिकाऱ्यांनी दिली.

श्री. देसाई यांनी सर्व सूचनांवर सकारात्मकदृष्टीने विचार करण्याची हमी दिली. श्री. देसाई म्हणाले की, मुंबई व परिसर तसेच पुणे जिल्हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. इतर ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत.

उद्योग सुरू करण्यासाठी घ्यावयाचे परवाने व इतर समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी व उद्योग विभागाच्या मैत्री व्यासपीठाद्वारे कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यावर संबधितांना आपल्या सूचना व समस्या मांडण्याचे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा