पाणी, चारा टंचाई व दुष्काळाबाबत अधिका-यांसमवेत छगन भुजबळ यांनी घेतला आढावा
----------------------------------------------
मनमाड, येवला शहरासह ३८ गावांना पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या - छगन भुजबळ
येवला, दि.४ मे (प्रतिनिधी) :- पाण्याचे शेवटचे आवर्तन असून पाऊस पडेपर्यंत नागरिकांना आणि जनावरांना पाणी पुरेल यासाठी मनमाड, येवला शहरासह ३८ गावांना पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. आज छगन भुजबळ यांनी आज राजापूर सह ४० गांवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, तालुक्यातील विजेचे प्रश्न, यासह येवला शहर व तालुक्यातील पाणी, चारा टंचाई व दुष्काळाबाबत त्यांनी आज आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आहिरे,जलसंपदा विभागाचे अभियंता वैभव भागवत, महावितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख , तालुका कृषी अधिकारी , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नगरपालिका गटनेते डॉ.संकेत शिंदे, प्रवीण बनकर, अजय जैन, सचिन शिंदे, प्रशांत शिंदे, निसार लिंबूवाले, अकबर शेख, मुश्रीफ शेख, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जीवनलाल काबरा, पुरुषोत्तम काबरा, शेतकरी संघटनेचे संतुपाटील झाबरे, बापू पगारे, ज्ञानेश्वर शेवाळे, नवनाथ काळे, भगवान ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, दीपक लोणारी, संतोष खैरणार, सुनील पैठणकर,भाऊसाहेब धनवटे आदी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली सुरू असल्याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी छगन भुजबळ यांच्याकडे केल्या. त्यानंतर छगन भुजबळ यांनी दुष्काळी परिस्थितीत वसुली करण्यात येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कुठल्याही शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव होता कामा नये अन्यथा आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक संस्था, नागरिक, विविध संघटना, कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतुन पुढे येण्याची गरज आहे. शासनस्तरावरून मदत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करत एकत्र येऊन सर्व प्रश्न मार्गी लावावे असे आवाहन त्यांनी केले. येवला येथील गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांना भुजबळांनी विनंती केल्याप्रमाणे चारा छावणी सुरू करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे गोशाळेत आणावी असे आवाहन त्यांनी केली.
---------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा